मुंबई- राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी त्यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात विद्या चव्हाण यांची सून डॉ. गौरी चव्हाण यांनी आपले मौन सोडले आहे. विद्या चव्हाण यांनी केलेल्या सर्व आरोपांचे डॉ. गौरी यांनी खंडन केले आहे.
११ जानेवारी अगोदरच मला विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी बळजबरीने घराबाहेर काढले होते. माझ्या ५ वर्षांच्या मुलीला त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतल्याने ११ जानेवारी रोजी मी व माझे वडील मुलीला भेटण्यासाठी विले-पार्ले येथील निवासस्थानी गेलो होतो. मात्र, येथे मला व माझ्या वडिलांना अर्वाच्य शिवीगाळ करीत जबर मारहाण करण्यात आली, असा आरोप डॉ. गौरी चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात मी विले-पार्ले पोलीस ठाण्यात विद्या चव्हाण व कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून माझ्या मुलीला मला भेटू दिले जात नाही. या उलट विद्या चव्हाण माझ्या मुलीचा वापर माझ्या विरोधात करीत असून मी दाखल केलेला विनयभंग व अमानुष छळाचा गुन्हा मागे घ्यावा म्हणून माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप डॉ. गौरी यांनी केला आहे.