मुंबई:राज्यात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने त्यांनी हिंदुत्व सोडले, अशी टीका भाजपने सातत्याने केली. शिंदे गटाकडूनही भाजपचा सूर आळवला गेला. महाविकास आघाडी राज्यात कायम राहिल्यास भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटाला सत्तेतून नेस्तनाबूत करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सात सभा होणार आहेत. येत्या 16 एप्रिलला नागपूरला भाजपच्या होम पीचवर सभा होणार आहे.
मविआमध्ये ठाकरे गट भक्कम: केंद्रात आणि राज्यात सरकारने हुकूमशाही आणि लोकशाही पद्धतीने कारभार चालवला आहे. सर्वसामान्यांची यातून सुटका करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रमुख नेते बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत; मात्र ठाकरेंचे हिंदुत्व आणि सावरकरांच्या परखड मुद्द्यावरून महाविकास आघाडीत ठाकरेंचे स्थान डळमळीत होईल अशी भाजपला श्ंका आहे. परंतु, महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट अधिक भक्कम असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिली.
Mahavikas Aghadi : 'सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी महाविकास आघाडी आवश्यक' - vajramuth sabha
देशातील लोकशाहीची मूल्ये, तत्त्व पायदळी तुडवण्याचा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रयत्न आहे. देशातील लोकशाही, संविधान आणि सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी असणे आवश्यक आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र राहून महाराष्ट्राचे भारतात नेतृत्व करतील आणि प्रमुख विरोधीपक्ष म्हणून भाजपसमोर उभे राहतील, अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज (मंगळवारी) मुंबईत मांडली. रामभक्ती आणि हिंदुत्व आम्हाला शिकवू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
तिन्ही पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत: महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्षांचे झेंडे, अजेंडे आणि आयडॉलॉजी वेगळी आहे; मात्र तिन्ही पक्षांचा समान शत्रू भाजप असल्याने महाविकास आघाडी एक प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून भाजप समोर आव्हान उभे करणार आहे. भाजपने देशासह राज्यात आजवर ज्या पद्धतीने सत्ता गाजविली त्याचा विचार करता संविधान आणि सर्वसामान्यांचे न्याय हक्क वाचवायचे असतील, लोकशाहीचे चारही स्तंभावरील राजसभेच्या माध्यमातून जो प्रभाव टाकला जातो आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करतील, असे प्रा. हाके म्हणाले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सल्ले नको: हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपचा वेगळा आहे. त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या समजावून सांगावी. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणजे काय केले, हे देखील सांगावे. महाराष्ट्रात आम्ही उठल्यानंतर रामराम म्हणतो. मारुतीच्या पायावर पाणी घालतो. त्यामुळे आम्हाला हनुमान चालिसा बोलायची गरज वाटत नाही. आमच्या रक्तात हिंदुत्व आहे; मात्र आज ज्या पद्धतीने हिंदुत्व आणि वीर सावरकर यात्रा काढली जाते, त्याबाबत भाजप उघडे पडत आहे. एकीकडे सावरकरांचा उल्लेख करतात. गायीबाबत सावरकरांचा दृष्टिकोन भाजपला मान्य आहे का, असा प्रश्न प्रा. हाके यांनी विचारला. तसेच हिंदुत्व आणि सावरकर यांचे नाव घेण्याचे भाजपला अधिकार नाहीत. शिवसेनेला त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सल्ले देऊ नयेत, असा इशारा प्रा. हाके यांनी दिला.