मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापनदिन मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार केवळ पाच वर्ष टिकणार नाही. तर, पुढील निवडणुकादेखील सोबत लढेल, असा विश्वास व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 12 महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक गुप्त भेट झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. या राजकीय चर्चेचे खंडन शरद पवार यांनी आपल्या भाषणातून केले. सत्ता स्थापन झाल्यापासून हे सरकार टिकणार नाही. टिकले तर किती दिवस टिकेल, अशा प्रकारच्या चर्चा विरोधक करत होते. विरोधक अजून त्याच नंदनवनात आहेत, असा टोला शरद पवारांकडून विरोधकांना लावण्यात आला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे आपला कार्यकाळ पूर्ण करेल तसेच पुढील काही निवडणुकाही महाविकास आघाडी म्हणून सोबत लढल्या जातील, असा विश्वास शरद पवारांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवला.
शिवसेनेवर पूर्ण विश्वास -
शिवसेना पक्षासोबत काम करण्याचा अनुभव जास्त नाही. मात्र, शिवसेनेने राज्यात केलेल्या कामावर राज्यातील लोकांना विश्वास आहे. संपूर्ण महाराष्ट्र शिवसेनेला पाहतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता की, निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून कोणताही उमेदवार उभा केला जाणार नाही. कोणत्याही पक्षासाठी निवडणूक न वाढवण्याचा मोठा निर्णय असतो. मात्र, एवढ्या मोठ्या निर्णयावरदेखील बाळासाहेब ठाकरे ठाम राहिले. त्यांनी दिलेला शब्द पाळला. त्या वेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकही उमेदवार इंदिरा गांधी यांच्या पक्षाच्या विरोधात उभा केला नव्हता. त्यामुळे शिवसेना पक्षावर शंका घेण्याचे काम नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.