मुंबई - कोरोना देशातून निघून जावा, यासाठी मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करत अल्लाकडे दुवा केली. शनिवारी देशभरात बकरी ईद साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवानी घरीच नमाज अदा करून साधेपणाने बकरी ईद साजरी केली. यावेळी मुस्लीम बांधवानी कोरोना बाबतच्या सरकारच्या नियमांचे सर्वत्र पालन केल्याचे चित्र दिसून आले.
बकरी ईद साधेपणाने साजरा करावी, असे आवाहन शहरातील विविध धर्मगुरू व मौलाना, संघटना यांनी केले होते. दरवर्षी सामुदायिकरित्या मशिदीमध्ये नमाज पठण केले जात होते. मात्र यंदा गर्दी न जमावण्याचे आदेश असल्यामुळें आज सामुहिक नमाज पठण केले गेले नाही. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण मुस्लीम बांधवानी घरच्या घरी केले. तसेच गल्ली-मोहल्ल्यातसुध्दा नागरिकांनी गर्दी न करता एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिंगन व हस्तांदोलन करत शुभेच्छा देणे टाळत लांबूनच शुभेच्छा दिल्या. दरवर्षी मुस्लीम बांधवांची रेलचेल असणाऱ्या रस्ते यावेळी सामसूम होते.