मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांना बरे करताना आरोग्य आणि पालिकेतील कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या वारसांना पालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
शहरात कोरोनाचे सुमारे १० हजार रुग्ण आहेत. ३८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांवर उपचार करण्याचे काम पालिकेच्या आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. शहरात रोगराई पसरू नये, मुंबईकरांना वेळेवर पाणी मिळावे, हातावर पोट असलेल्या नागरिकांना अन्न मिळावे म्हणून पालिका कर्मचारी काम करत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ४ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अन्न वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.