मुंबई - समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६४ वर्षे जुन्या आणि भरभक्कम असणाऱ्या दोन पोलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या 'लायन्स चिल्ड्रन पार्क'मध्ये आहेत. या तोफांना एक नवी झळाळी मिळावी, या दृष्टीने दोन्ही तोफा भव्य-दिव्य पद्धतीने पुन्हा स्थापित करण्याच्या प्रस्तावास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.
हेही वाचा -बिग बॉस फेम एजाज खानला अटक, ड्रग्ज डिलर शादाब शेखशी मैत्री भोवली
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या घाटकोपर पूर्व परिसरातील 'लायन्स चिल्ड्रन पार्क' हे १९७१ पासून मुंबईकरांच्या सेवेत आहे. ५५ हजार ८४३ चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणाऱ्या हिरवाई सोबतच 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या काळातील दोन तोफा या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा आतील घेर हा ०.६४ मीटर आणि बाहेरील घेर १.१७ मीटर इतका आहे.