मुंबई- मुंबईत रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईत गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच खड्डे बुजवण्याची मागणी केली जात होती. मात्र, गणेश विसर्जन आले तरी अद्याप रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. याचे पडसाद काल (बुधवार) पालिकेच्या सभागृहात उमटले. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्सही निष्क्रिय ठरले आहे. यामुळे खड्ड्यात एखादा अपघात झाला तर त्याला प्रशासन जबाबदार राहिल, असे निवेदन करून स्थायी समिती यशवंत जाधव यांनी झटपट सभा तहकूबी मांडली. यापुढे खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स नको हॅाटमिक्सच हवे, अशी मागणीही यावेळी सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
हेही वाचा - रस्त्यातील एक खड्डा बुजवण्याचा खर्च तब्बल 2 लाख 3 हजार 966 रुपये..!
रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स वापरण्यात आले. मात्र, या कोल्डमिक्सने खड्डे भरलेच नाहीत. गणेशाचे आगमन व विसर्जनही खड्डे पार करत करावे लागणार आहे. आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या कोल्डमिक्सचा परिणाम काहीही झाला नसल्याचे समोर आले आहे. सगळीकडे रस्ते खड्डेमय झाले असून अनेकांना कसरत करून प्रवास करावा लागतो आहे. सद्यस्थितीत शहरातील बऱ्याच रस्त्यांत खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे अतोनात हाल होणार आहेत. त्यामुळे रस्त्यातील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महासभेत निवेदन केले. अशा खड्डेमय रस्त्यावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल विचारत खड्डे बुजवण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाचा निषेध विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावेळी केला.
विभागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याचा पाढाच नगरसेवकांनी वाचला. कोल्डमिक्स नको हॅाटमिक्स वापरा, अशी मागणी यापूर्वीच्या सभात अनेकवेळा करूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. दरम्यान प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ झटपट सभा तहकूबी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली व बहुमताने मंजूर झाली. गणरायाचे आज विसर्जन होत आहे. यावेळी मिरवणुकीत रस्त्यातील खड्ड्यांत एखादा अपघात घडला तर त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल, याकडेही जाधव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
हेही वाचा - मुंबईतील 'ही' उद्याने राहणार आता २४ तास खुली, पालिका प्रशासनाचा निर्णय