मुंबई -येथील वांद्रे-कुर्ला संकुल येथील रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचे रुपांतर कोरोना काळजी केंद्रात होणार आहे. मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.
मुंबईचे रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटर बनणार कोरोना केअर सेंटर - रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटर मुंबई बातमी
कोव्हीड - १९ रुग्णालयासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली.
अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी जिओ कन्वेंशन सेंटरचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. अस्लम शेख यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुंबई उनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे पालिका उपायुक्त व अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत एक पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी जिओ कन्वेंशन सेंटरलाही भेट दिली होती.
या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना कोव्हीड - १९ रुग्णालयासाठी रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार चालू असल्याची माहिती त्यांनी दिली होती. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ कन्वेंशन सेंटरची 1 हजार 500 रुग्णांची सोय होऊ शकेल इतकी क्षमता आहे. लवकरच या कन्वेंशन सेंटरचे रुपांतर सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांंगितले आहे.