मुंबई - लॉकडॉऊनचा पाचवा टप्पा सुरू झाल्यानंतर राज्य शासनाकडून तब्बल तीन महिन्यानंतर मुंबईत काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. छोट्या मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी मुंबईतले गजबजलेल ठिकाण म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. आशियातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ, सोन्याच्या दागिन्यांची दुकाने, गृहपयोगी वस्तू मिळणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सम आणि विषम अशा पॅटर्न नुसार दुकाने उघडण्यात आलेली आहेत. लॉकडाऊच्याआधी दरदिवशी शेकडो कोटींची उलाढाल होत असलेले क्रॉफर्ड मार्केट तब्बल तीन महिने बंद होते. आता क्रॉफर्ड मार्केट हे पुन्हा चालू झाल्यामुळे येथे ग्राहकांची थोडी फार गर्दी पाहायला मिळत आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्या शंभर वर्षाहून अधिक जुने ‘काका हँगर्स' नावाचे असलेले दुकान साजिद पटका हे चालवतात. गेली 3 पिढ्यांपासून सुरू असलेले हे दुकान पहिल्यांदाच एवढी महिने बंद राहिल्याचे साजिद सांगतात. साजिद पटका यांच्याकडे लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर जवळपास सहा कामगार होते. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडल्याने त्यांच्याकडे आता फक्त एकच कामगार उरलेला आहे. इतर कामगार त्यांच्या घरी निघून गेल्यामुळे आता दुकानावर मनुष्यबळ कमी झाले आहे.