मुंबई -अंधेरी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील अनेक धोकादायक असलेल्या पुलांवर रहदारीसाठी आणि गणेशोत्सवादरम्यान गर्दी करून मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. यंदा पालिकेने दहा पुलांची यादी जाहीर केली असून गणेशमूर्तीचे आगमन किंवा विसर्जन करताना गर्दी करू नये, लाऊडस्पिकरचा वापर करू नये आणि पुलावर जास्त वेळ थांबू नये, असे निर्देश पालिकेने दिले आहेत.
९ जणांचा झाला मृत्यू -
अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून २ जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ अशा ९ जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३५० पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी आठवडाभर आधीच धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी, असेही निर्देश पालिकेने दिले आहेत.