मुंबई - आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आपल्याला घरपोच मिळाव्यात अशी आपली इच्छा असते. ही गरज ओळखून मुंबईच्या सागर यरनाळकर या तरुणाने एका अॅपची निर्मीती केली आहे. ज्या अॅपच्या माध्यमातून रोज लागणाऱ्या वस्तू आपल्या घरापर्यंत येऊ शकतात. या अॅपचे नाव आहे, डेली निन्जा अॅप. विशेष म्हणजे या शोधासाठी सागरची दखल थेट फोर्ब्सने घेतली आहे.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात घरगुती सामान, किराणा माल, भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जाणे अवघड असते. बाहेर जाण्यासाठी अतिरिक्त वेळ काढावा लागतो. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही गोष्ट थकवणारी असते. अशा परिस्थितीत दैनंदिन गरजेच्या वस्तू घरपोच मिळाव्यात अशी आपली अपेक्षा असते. हीच अपेक्षा ओळखून सागर यरनाळकर याने या अॅपची निर्मीती केली आहे. हे अॅप्लीकेशन घेतले तर तुमचा दुधवाला तुम्हाला सामान घरपोच आणून देऊ शकतो.
काय आहे डेली निन्जा अॅप
मूळचा ठाण्याच असणारा सागर यरनाळकर याने हे अॅप बनविले आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने त्यानं दूधवाल्यांचे नेटवर्क तयार केले आहे. दूधवाल्यांचे नेटवर्क वापरून त्याने घरपोच किराणा, फळे आणि भाजीपाला मिळेल अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डेलि निंजा हे अॅप सध्या मुंबई, पुणे, बंगळुरु, मैसूर, चेन्नई आणि हैद्राबाद या सहा शहरांमध्ये सुरू आहे. या सहा शहरांमध्ये २ हजार ४०० दुधवाले कार्यरत आहेत. या सहा शहरांमधील दुधवाल्यांचं नेटवर्क सांभाळण्यासाठी ४०० हून अधिक जणांची टीम काम करते. जवळपास ७० हजार घरांमध्ये डेलि निंजाद्वारे सामान पोहोचवण्याचे काम होत आहे.
सागर आणि त्याचा मित्र अनुराग गुप्ता यांनी एकत्र येत हा व्यवसाय सुरू केला. सागर आणि अनुराग हे दोघे या व्यवसायात पार्टनर आहेत. सागरने इंजिनयरिंगची पदवी घेतली आहे. पण इंजिनयरिंगची नोकरी न करता त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. नुकतंच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या यादीत त्याच्या नावाची दखल घेण्यात आली आहे.