मुंबई :मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या निमित्ताने राज्यभरातून अनेक तरूण येत असतात. त्यांचा जेवणाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो. मुंबई पश्चिम उपनगरातील सांताक्रुज येथील वाकोला परिसरात असलेल्या श्रीकृष्ण नगर येथे राहणाऱ्या महिलांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांना मायेचा घास खाऊ घातला आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या आणि रिकाम्या पोटी रस्त्यावर झोपणाऱ्या या युवकांबाबात श्रीकृष्ण नगरमधील महिलांच्या मनात मायेची ऊब निर्माण झाली. त्यांनी आपल्या हाताने बनवलेला मायेचा घास खाऊ घालण्याचा पवित्रा हाती घेतला.
पोलीस भरती सुरू :खाकी वर्दी घालून देशसेवा करायची, हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्याचाच एक भाग म्हणजे मैदानी चाचणी होय. सध्या मुंबईमध्ये पोलीस भरती सुरू आहे. या भरतीसाठी येणारे बहुतेक तरुण हे ग्रामीण भागातील आहेत. बहुतांश मुलांना पडलेली आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना चारशे रुपयात मिळणारे जेवण खिशाला झेपत नसल्याने उपाशीपोटीच रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे.
उपाशीपोटी झोपावे लागत : मुंबईत आलेला माणूस कधीच उपाशी राहत नाही, याचा अनुभव मुंबईत पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या युवकांना आली आहे. मुंबई पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर, धुळे, यवतमाळ, अकोला, वर्धा अशा अनेक ग्रामीण भागातून युवक मुंबईत दाखल झाले. मात्र, त्यांना पोलीस भरतीच्या ठिकाणी देण्यात येणारे चारशे रुपयांत जेवण परवडत नसल्याने उपाशीपोटी झोपावे लागत होते. त्यांची झालेली ही स्थिती वाकोला परिसरात असलेल्या श्रीकृष्ण नगरमधील सुधाकर ठाकूर यांच्या निदर्शनास पडली. वाकोला येथे असलेल्या श्रीकृष्ण नगर परिसरात श्रीकृष्ण मंदिर आहे. पोलीस भरतीसाठी आलेले तरुण मंडळी विश्रांतीसाठी येतात. त्यांची भेट ठाकूर यांच्याशी झाली आणि तिथेच त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न संपला.