मुंबई - डिसेंबर जानेवारीपर्यंत कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने पुन्हा फेब्रुवारीपासून कोरोना वाढू लागला आहे. मुंबईकरांनी कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असा निर्वाणीचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. तर नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर अंशतः लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाईल -
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून कोरोना विरोधात लढा दिला जात आहे. डिसेंबर २०२० मध्ये मुंबईतून कोरोना हद्दपार होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतू फेब्रुवारी २०२१ नंतर पुन्हा एकदा कोरोनाचा झपाट्याने फैलाव सुरु झाला. गेल्या १५ दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण संख्येत ७०० ते एक हजाराने वाढ होत असून गेल्या दोन दिवसांत २ हजारांच्या घरात रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची सध्या भयावह स्थिती नसली, तरी नियमांचे पालन न केल्यास स्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती मुंबई महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
टप्याटप्प्याने कठोर अंमलबजावणी -
रुग्ण वाढीचा अभ्यास केला जात असून लाॅकडाऊन किंवा रात्रीची संचारबंदी हा पर्याय सध्या पालिकेच्या विचाराधीन नाही. मात्र, टप्याटप्प्याने मुंबईत कठोर अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिला.
स्वच्छता ठेवा -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजही झोपडपट्टी परिसरात सॅनिटायझ करणे, जनजागृती अभियान राबवणे, इमारतीतील रहिवाशांनी इमारतीतील जिन्याचे राॅड, इमारत परिसर स्वच्छ ठेवणे, सॅनिटायझर करणे या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे, असे ही त्यांनी सांगितले.