मुंबई :संडे मॉर्निंग सर्वांना हवीहवीशी असते. त्यातच मुंबई आणि ते सुद्धा मरीन ड्राईव्ह सारख्या परिसरात या दिवसाची सुरुवातच संगीताने करायची असेल, तर मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आवर्जून भेट द्यायला हवी. मुंबई शहर, उपनगर या परिसरातून येणारे तरुण इथे संगीताची जादू चालवताना दिसत आहेत. संगीताच्या तालावर संपूर्ण तरुणाई मनमुराद आनंद लुटताना दिसून येत (musical Sunday morning at Marine Drive) आहे.
संगीत एक जादू :तणावमुक्त आणि आरोग्यदायी वातावरणात आठवड्यातील किमान काही तास तरी घालविता यावेत, या हेतूने मुंबई पोलिसांनी ‘संडे स्ट्रीट' ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. मुंबईतील काही रस्ते हे अंशतः तर काही ठिकाणी पूर्णतः सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. याला मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात आहे. त्यातच सकाळी बहुतेक लोक मॉर्निंग वॉक करण्याच्या निमित्ताने मुंबईच्या रस्त्यांवर दिसून येतात. परंतु आता अनेक तरुण मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात संगीताचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. या तरुणाईला संगीताची एवढी आवड आहे की, यासाठी लागणारे सर्व साहित्य गिटार, ढोल, तबला हे सर्व घेऊन हे तरुण भल्या पहाटे मरीन ड्राईव्ह येथे समुद्रकिनारी जमा होतात. हे सर्व युवक - युवती मुंबईतील विविध भागातून मरीन ड्राईव्ह येथे सकाळी सकाळी जमा होऊन आपल्यासोबत इथे येणाऱ्या सर्व लोकांना या संगीताच्या जादूने आकर्षित (Mumbaikar enjoying musical Sunday morning) करतात.