मुंबई -मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. पुढील महिन्यात १० सप्टेंबरला मुंबई विद्यापीठातील १० सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी सुमारे ९५ हजार मतदार मतदान करणार होते. मात्र, अचानक ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केल्याने विविध विद्यार्थी संघटनांनी व राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिनेट निवडणूक पुढे ढकलली -मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत ही गेल्यावर्षी २०२२ सप्टेंबर महिन्यातच संपुष्टात आली होती. पुढची सिनेट नोव्हेंबर महिन्यात अस्तित्वात येणे अपेक्षित असले तरी विद्यापीठाचा कारभार प्रभारींवर अवलंबून असल्याने निवडणुका लांबल्या आहेत. परंतु या महिन्यात ९ ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम घोषित झाला. १० सप्टेंबरला मतदान होऊन मतमोजणी १३ सप्टेंबरला होणार असताना अचानक ही निवडणूक पुढे ढकलली असल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल - ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. गुरुवारी रात्री 11 वाजता सिनेट निवडणूक पुढे ढकलण्याचे पत्र काढण्यात आले. शंभर टक्के आमच्या बाजूने निकाल लागला असता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि नंतर स्थगित झाला. मणिपूरसारखे वातावरण येथे नाही. भांडण नाही, वाद नाही. सव्वा लाख मतदारांनी यामध्ये नाव नोंदविले आहे. मग असं काय घडलं? ही निवडणूक स्थगित का केली? कोणी बैठक घेतली? मुंबई विद्यापीठाचे अधिकारी फोन बंद करून बसलेत. कोणीही कारण सांगायला तयार नाही. मुख्यमंत्री डरपोक आहेत, त्यांचा दबाव यामध्ये आहे का? असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारले.
हरणार याच भीतीपोटी निवडणूक पुढे ढकलली - सिनेट निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत म्हणाले की, राज्यातले सरकार भीतीपोटी कुठल्याही निवडणुका घ्यायला तयार नाही. सिनेट निवडणुका रद्द झाल्याने आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. या निवडणुकीत शिवसेनेच्या युवा पॅनलचा १०० टक्के विजय होणार होता. आपण हरणार याच भीतीपोटी निवडणुका रद्द करणार आहात का? महापालिकेच्या निवडणुका याच भीतीमुळे तुम्ही घेत नाहीत. तसेच उद्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकासुद्धा तुम्ही योग्यवेळी घेणार नाहीत का? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. सरकारने दिलेल्या आदेशामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला.
जवळपास १२ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल हा आपल्याविरोधात जाऊन जनतेमध्ये सरकारच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ होईल, या भीतीने ही निवडणूक स्थगित केली आहे - ठाकरे गटाचे युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत