मुंबई - ठाणे-नवी मुंबईमधून शहरात येण्यासाठी वाहनचालकांना पाच टोलनाके पार करावे लागतात. या टोलनाक्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. कारण, आता या टोलनाक्यांचा विस्तार करत मार्गिका वाढवण्यात येणार आहेत. जेणेकरून येत्या काळात टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच फास्टटॅगची प्रक्रिया योग्य प्रकारे मार्गी लावता येईल.
'ही' आहेत मुंबईतील पाच प्रवेशद्वार -
ठाणे आणि नवी मुंबई-पुणे, पालघर-वसई-विरार येथून मुंबईत येण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पाच प्रवेशद्वार आहेत. या पाच प्रवेशद्वारांवर टोल भरत त्यांना मुंबईत यावे लागते. यात वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाक, एलबीएस टोलनाका, मुलुंड आणि दहिसर टोलनाका या पाच टोलनाक्यांचा समावेश आहे. एमएसआरडीसीच्या ताब्यातील या टोलनाक्यांवर खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून टोलवसुली केली जाते. तर हे पाचही टोलनाके अत्यंत महत्त्वाचे असून येथे कायम वाहतूककोंडी असते.
म्हणून टोलनाक्यांचा विस्तार -
या पाचटोलनाक्यांवर सकाळी आणि रात्री वाहतूककोंडी होत असते. त्यात फास्टटॅगसाठी स्वतंत्र मार्गिका देण्यात आल्या आहेत. पण या मार्गिकेत विनाफास्टटॅग वाहनचालक घुसतात. त्यामुळे फास्टटॅगच्या मार्गिकेतही कोंडी होते. त्यात या टोलनाक्यांवर कमी मार्गिका असल्याने आणि वाहनांची मोठी संख्या पाहता विनाफास्टटॅग वाहनचालकाविरोधात कारवाई करणे शक्य होणार नाही. एकूणच ही बाब लक्षात घेत, आता या टोलनाक्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएसआरडीसीचेमुख्य व्यवस्थापकीय संचालक (टोल)कमलाकर फंड, यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
बंद जकातनाक्याच्या जागा ताब्यात घेणार -
मुंबईतील टोलनाक्याचा विस्तार करत मार्गिका वाढवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला खरा. पण हा विस्तार कसा करणार, जागा कशी आणि कुठून उपलब्ध करणार, हा प्रश्न होता. पण हा प्रश्न एमएसआरडीसीने सोडवल्याचे फंड यांनी सांगितले आहे. टोलनाक्याच्या बाजूला मुंबई महानगरपालिकेचे जकात नाके आहेत. या जकात नाक्याची मोठी जागा आहे. देशात जीएसटी लागू झाल्याने हे जकात नाके बंद झाले आहेत. तेव्हा या जागा आम्हाला मिळाल्यास जागेचा प्रश्न मार्गी लागेल. यानुसार आम्ही पालिकेकडे तशी मागणी केली आहे. यासाठी पाठपुरावाही सुरू आहे, असे फंड यांनी सांगितले. ही जागा मिळाली आणि विस्तारीकरणाचे काम सुरू होऊन मार्गिका वाढल्यास नक्कीच याचा मोठा फायदा वाहनचालकांना-प्रवाशांना होणार आहे, हे महत्त्वाचे.