मुंबई Mumbai Terror Attack :जगाला हादरवून टाकणाऱ्या मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. या हल्ल्यातील आरोपी तथा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा हस्तक तहव्वूर राणा याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई गुन्हे शाखेनं तहव्वूर राणाविरोधात तब्बल 415 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र किल्ला कोर्टातील न्याय दंडाधिकाऱ्यांकडं दाखल केलं आहे. दरम्यान या प्रकरणाची आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी सोमवारी तहव्वूर राणाविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये पोलिसांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामागील गुन्हेगारी कटात तो सामील होता, हे स्पष्ट केलं. न्यायालयानं आम्हाला त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यास सांगितलं आहे. तहव्वूर राणाचं प्रत्यार्पणाला स्थगिती मिळवण्यासाठीचं अपील टकणार नाही. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पण स्थगितीला तीव्र विरोध करेल - उज्वल निकम, विशेष सरकारी वकील
मुंबई दहशतवादी हल्ल्यात राणाचा सहभाग :जगाला हादरवून सोडणारा मुंबईवरील 26/11 हा दहशतवादी हल्ला अत्यंत वेदनादायी आहे. भारतीय नागरिकांच्या मनावर या हल्ल्यानं मोठा घात झाला होता. असंख्य निरपराध नागरिक मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडले होते. हा हल्ला करण्याच्या कालावधीमध्ये आरोपी असलेला सूत्रधार तहव्वूर राणा हा 11 ते 21 नोव्हेंबर 2008 या कालावधीत मुंबईतच तळ ठोकून होता, असा दावा या आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्याचा या संपूर्ण हल्ल्याच्या कटामध्ये सहभाग असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. या संदर्भाचे आरोपपत्र न्यायदंडाधिकारी न्यायालयात मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलं आहेत.