मुंबई - कोरोना विषाणूचे रूग्ण वाढत असल्याने क्वारंटाईन करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या नव्या इमारती ताब्यात घेतल्या जात आहेत. एसआरएच्या इमारतींमध्ये गरीब राहत असल्याने क्वारंटाईन करण्यासाठी त्यांची घरे न घेता रिक्त असलेल्या टॉवरमधील घरे आणि श्रीमंताचे बंगले ताब्यात घ्यावेत, अशी मागणी मुंबई भाडेकरू परिषदेने केली आहे. परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी ही मागणी केली. गरिबांची घरे क्वारंटाईनसाठी घेतल्यास उद्योगपती अंबानीच्या घरात घुसून त्याचा ताबा घेऊ, असा इशारा मुंबई भाडेकरू परिषदेने दिला आहे.
मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. कोरोना रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे. क्वारंटाईन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एसआरएच्या इमारती ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे ज्या झोपडी धारकांना ही घरे मिळायला हवी होती, ती अद्याप मिळालेली नाहीत. या इमारती बांधून तयार व्हाव्यात या प्रतिक्षेत झोपडीधारक 7 ये 10 वर्ष भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत. आता तर लॉकडाऊनमध्ये घरभाडे देणे या नागरिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे एसआरएच्या इमारतीमधील झोपडीधारकांची घरे त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी भाडेकरू परिषदेने केली.