मुंबई -शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी शिक्षण व वित्त विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी विभागातील काही अधिकारी आणि एका राष्ट्रीय बँकेच्या दिरंगाईमुळे मुंबई आणि परिसरातील शेकडो शिक्षकांची दिवाळी कोरडी गेली आहे. या शिक्षकांचे वेतन दिवाळीत न झाल्याने शिक्षकांमध्ये या सर्व प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - मी म्हातारा झालो असेल तर घरी नातू-पणतू सांभाळेन, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
मुंबई आणि परिसरातील सुमारे चार हजार शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी झालेले नाही, अशी माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. शिक्षण व वित्त विभागाकडून हे वेतन दिवाळीपूर्वी शिक्षकांना देण्यात यावे, यासाठीची कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, थोड्याशा दिरंगाईमुळे युनियन बँकेतील वेतन शिक्षकांना वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे या दिवाळीत शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ज्या बँकांच्या दिरंगाईमुळे शिक्षकांना दिवाळीत वेतनापासून वंचित राहावे लागले. त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणीही दराडे यांनी केली. दुसरीकडे काही शाळांनी वेतनासाठीची कार्यवाहीही उशिरा केली त्याचाही फटका शिक्षकांना बसला त्यामुळे हे वेतन उशिरा मिळाले असल्याचे ते म्हणाले. मुंबई आणि परिसरातील शिक्षकांचे वेतन हे प्रामुख्याने युनियन बँक आणि मुंबई बँकेत जमा होत असते. यापैकी मुंबई बँकेतून शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन मिळाले असल्याचेही सांगण्यात आले.
शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी आपल्या कार्यकाळात म्हणजेच मागील चार वर्षांपूर्वी शिक्षकांना दिवाळीत त्यांचे वेतन वेळेत मिळावे यासाठी पाठपुरावा केला होता. तेव्हापासून शिक्षकांना दिवाळीपूर्वी काही दिवस वेतन दिले जाते. यावेळी ही कारवाई करण्यात आली असली तरी केवळ थोड्याशा दिरंगाईमुळे मुंबईतील सुमारे चार हजाराहून अधिक शिक्षकांना वेतन न मिळाल्याने आपली दिवाळी कोरडी साजरी करावी लागली असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तडा; ९० दिवसात १० हजार कोटींचे नुकसान