मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई टी-२० लीग स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. याची माहिती मुंबई लीग गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
राज्यात बुधवारी ६३ हजार ३०९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर ९८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ४४ लाख ७३ हजार ३९४ इतका झाला आहे. मुंबईत बुधवारी ४ हजार ९६६ नवे रुग्ण आढळले. तर ७८ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवरर मुंबई लीग पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि मुंबई प्रीमिअर लीग गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मुंबई लीग मालिका पुढे ढकलत असल्याचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात एक पत्र ट्विट केलं आहे. यात त्यांनी, 'देशातील सध्याची कोरोना स्थिती पाहता सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट लीगचा ३ रा हंगाम पुढे ढकलत आहोत. पुढचा निर्णय येईपर्यंत हा आदेश लागू राहील', असे म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण आणि सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.