मुंबई :भीमा कोरेगाव (Bhima Koregaon case) आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांना, मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Supreme Court) दिलेला जामीन रद्द करण्यात यावा, याकरिता सर्वोच्च न्यायालयात एनआयएच्या वतीने धाव घेण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने एनआयएची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांचा कारागृहातुन बाहेर येण्याचा मार्ग मोकळा (relief to accused Anand Teltumbde) झाला आहे. उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर 10 दिवसाचा अवधी एनआयएला, या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरिता दिला होता.
खंडपीठाने याचिका फेटाळली : उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांना खटल्यातील निर्णायक अंतिम निष्कर्ष मानले जाणार नाही, असे सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड तसेच न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळतांना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस.गडकरी तसेच न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने तेलतुंबडे यांना जामिन देतांना दहशतवादी कारवायांसंबंधीचा कुठलाही पुरावा नसल्याचे, प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याने निरीक्षण नोंदवले होते.
फसवले जावू शकत नाही : भीमा कोरोगाव प्रकरणात तेलतुंबडे यांची भूमिका काय होती? असा सवाल सरन्यायाधीशांनी एनआयएची बाजू मांडणारे एएसजी ऐश्वर्या भाटी यांना विचारला. तेलतुंबडे विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून, त्यांनी बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय मार्क्सवादी विचारधारेला वाढवण्यासाठी आणि सरकारला पायउतार करण्याचा षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्ता दलित विचारधारा आंदोलन क्षेत्रातील एक बौद्धिक प्रमुख व्यक्ती आहे. 30 वर्षांपूर्वी सीपीआय करीता भूमिगत झालेला वांटेड आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचे जेष्ठ बंधु असल्याने त्यांना याप्रकरणात फसवले जावू शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.
एनआयएची सर्वोच्च न्यायालयात धाव :भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. एनआयएच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने आदेशाला एका आठवड्यासाठी स्थगिती दिली होती. दरम्यान तेलतुंबडे यांना जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा विरोधात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेलतुंबडे यांच्यावर भीमा कोरेगाव प्रकरणात बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी एनआयएच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले होते.