महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर सज्ज; ७२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क - Mumbai Suburban District Poll News

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजे २६ मतदारसंघ मुंबई जिल्ह्यात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात असणारी मतदार संख्या देखील राज्यात सर्वाधिक आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यात ३३ लाख १५ हजार ३३६ स्त्री मतदार असून पुरुष मतदारांची संख्या ३९ लाख ४७ हजार ३८५ एवढी आहे. तसेच ५२८ इतर मतदार देखील जिल्ह्यात आहेत. यानुसार एकूण मतदार संख्या ही ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी आहे.

भारत निवडणूक आयोग

By

Published : Oct 20, 2019, 8:41 PM IST

मुंबई- महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असा लौकिक असणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात तब्बल ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी मतदार संख्या आहे. सोमवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांना सहभागी होता यावे यासाठी तब्बल ७ हजार ३९७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी सुमारे ६० हजार कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. ही माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आयोजित केलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत दिली आहे. दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी ६ वाजेपूर्वी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. तरी अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बोरीकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे.

मतदार संख्या

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजे २६ मतदारसंघ मुंबई जिल्ह्यात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात असणारी मतदार संख्या देखील राज्यात सर्वाधिक आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यात ३३ लाख १५ हजार ३३६ स्त्री मतदार असून पुरुष मतदारांची संख्या ३९ लाख ४७ हजार ३८५ एवढी आहे. तसेच ५२८ इतर मतदार देखील जिल्ह्यात आहेत. यानुसार एकूण मतदार संख्या ही ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ३ लाख ७९ हजार २७९ मतदार हे चांदिवली मतदारसंघात आहेत. तर या खालोखाल गोरेगाव मतदारसंघात ३ लाख २७ हजार ८९९ आणि अंधेरी पश्चिम मतदारसंघात ३ लाख ६ हजार २११ एवढी मतदार संख्या नोंदविण्यात आली आहे. तसेच सर्वात कमी म्हणजेच २ लाख ३१ हजार ४७ एवढे मतदार विक्रोळी मतदारसंघात आहेत.

वाहन व्यवस्था

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघात एकूण ७ हजार ७१९ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रांमध्ये २ हजार ३० स्वयंसेवक कार्यरत असणार असून दिव्यांगासाठी ‘व्हील चेअर्स’ चे नियोजन करण्यात आले आहे.

सखी केंद्र

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'स्विप' (SVEEP) कार्यक्रमाची अधिकाधिक परिपूर्ण अंमलबजावणी मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू असून मुंबई उपनगर जिल्ह्यात २८ सखी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सर्व २८ सखी केंद्रांचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे, ही मतदान केंद्रे केवळ महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित होणार आहेत.

वेबकास्टींग

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ७ हजार ३९७ मतदान केंद्रांपैकी १० टक्के मतदान केंद्रांवर म्हणजेच ७४१ मतदान केंद्रांवरील कार्यवाहीचे वेबकास्टींग (Live Webcasting) केले जाणार आहे. या मतदान केंद्रांवरील घडामोडींचे वेबकास्टींग करण्यात येणार असून या माध्यमातून तेथील घडामोडींवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे.

मतदान केंद्रात जाताना मतदारांना भ्रमणध्वनी नेण्यास परवानगी नाही

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रात भ्रमणध्वनी संच (Mobile / Cellular Phone) आणण्यास व वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यात येत्या सोमवारी, म्हणजेच दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी मतदारांनी त्यांच्यासोबत भ्रमणध्वनी आणू नये, असे निवडणूक आयोगाकडून निर्देश देण्यात आले आहे.

वैध मतदार ओळखपत्रासह १२ ओळखपत्रांचे पर्याय ओळख पटविण्यासाठी ग्राह्य

भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या ११ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. या ११ ओळखपत्रांमध्ये १) पारपत्र (पासपोर्ट), २) वाहन चालक परवाना (Driving License), ३) छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र / राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनीने दिलेले ओळखपत्र), ४) बँक किवा पोस्ट ऑफिसद्वारे देण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक, ५) पॅनकार्ड, ६) नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) अंतर्गत 'रेसिस्टेंस जीन आइडेंटीफायर' (RGI) द्वारे दिले गेलेले स्मार्टकार्ड, ७) मनरेगा कार्यपत्रिका, ८) कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ९) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, १०) खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, ११) आधारकार्ड यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details