मुंबई -मराठी टीव्ही वाहिनीच्या सह-प्रवर्तकाचा जामीन गुरुवारी दिंडोशी येथील मुंबई सत्र न्यायालयाने मंजुर केला. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी शोधलेल्या टीआरपी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप मराठी वाहिनीवर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर. सित्रे यांनी सह-प्रवर्तकाचा पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यांवर इतर अटींसह जामीन मंजूर केला.
फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत नमूद केल्यानुसार पोलिसांनी अटकेच्या प्रक्रियेचे पालन केले नाही, असा दावा करत मराठी टीव्ही वाहिनीच्या सह-प्रवर्तकाने जामीन अर्ज दाखल केला होता. भारतीय दंड संहितातील तरतुदींनुसार त्याच्यावर आरोप सिद्ध होतील, असे काहीही नाही, असेही ते म्हणाले. तसेच मराठी टीव्ही वाहिनीच्या टीआरपी वाढीसाठी पैसे देण्यात आल्याचा आरोप सह-प्रवर्तकाच्या वतीने उपस्थित असलेले वकिल अनिकेत निकम यांनी फेटाळून लावला.
वकिल अनिकेत निकम सह-प्रवर्तकाच्या बँक स्टेटमेंटवर अवलंबून राहून आपल्या दाव्याला पाठिंबा दर्शविला. टीआरपी रेटिंग्स आणि महसूल प्रत्यक्षात विचाराधीन संबंधित कालावधीत घटला होता. ज्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी पैसे देण्यात आले, असा पोलिसांचा दावा खोटा ठरतो. मुंबई पोलिस जे काही म्हणत होते. ते जादूटोणा करण्यासारखे होते, असे वकिल अनिकेत निकम म्हणाले.