महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील शाळांची घंटा वाजणार, पुढील आठवड्यात निर्णय - mumbai corona crisis news

मुंबईत शाळा सुरू करताना महापालिका, अनुदानित, विना अनुदानित शाळा तसेच इतर शाळांमधील तब्बल 13 ते 14 हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. सर्व शाळा सुरू करण्यापूर्वी सॅनिटाईज म्हणजेच स्वच्छ कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांची 50 उपस्थिती राहावी, यासाठी नियोजन करावे लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील शाळांची घंटा वाजणार
मुंबईतील शाळांची घंटा वाजणार

By

Published : Feb 6, 2021, 2:31 PM IST

Updated : Feb 6, 2021, 4:46 PM IST

मुंबई - मुंबईमधील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले अकरा महिने शाळा बंद आहेत. राज्यातील शाळा 27 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. 1 फेब्रुवारीपासून लोकल ट्रेन सुरू झाल्या आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यानी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 15 फेब्रुवारीपासून किंवा त्यानंतर 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत येत्या सोमवार मंगळवारी बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अकरा महिने शाळा बंदच!

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबईत मार्च 2020 पासून प्रादुर्भाव सुरू झाला. ऐन परीक्षा तोंडावर असताना शाळा बंद करण्यात आल्या. दहावी परीक्षेचा एक पेपरही रद्द करण्यात आला. त्यानंतर गेले अकरा महिने शाळा बंद आहेत. 2020 - 21चे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शिक्षणाने सुरू झाले. राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने 27 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना गेला नसल्याने 16 जानेवारीपासून पुढील आदेश मिळेपर्यंत बेमुदत शाळा बंद राहतील, असे आदेश पालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत.

हेही वाचा -राज्यात आज 42 हजार 609, तर आतापर्यंत 4 लाख 32 हजार लसीकरण


सोमवार मंगळवारी बैठक

राज्य सरकारने 27 डिसेंबरपासून 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमधील लोकल ट्रेनही 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेतून दिली आहे. 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग यांची पुढील आठवड्यात सोमवार मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीत शाळा सुरू कराव्यात किंवा करू नयेत, याबाबतचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ही तयारी करावी लागणार

मुंबईत शाळा सुरू करताना महापालिका, अनुदानित, विना अनुदानित शाळा तसेच इतर शाळांमधील तब्बल 13 ते 14 हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. सर्व शाळा सुरू करण्यापूर्वी सॅनिटाईज म्हणजेच स्वच्छ कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांची 50 उपस्थिती राहावी यासाठी नियोजन करावे लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

आधी लस, नंतर शाळा

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी 18 वर्षाखालील मुलांना लस दिली जाणार नाही. यामुळे विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची होऊ शकते. यासाठी खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना लस द्यावी. नंतरच शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपा स्वीकृत नगरसेवक व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांचे संपूर्ण कुटूंब बाधित होऊ शकते. यासाठी विद्यार्थ्यांना लस दिल्यानंतर शाळा सुरू कराव्यात, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने १७० बेरोजगार युवक-युवतींना मिळाला रोजगार

Last Updated : Feb 6, 2021, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details