मुंबई - मुस्लिम धर्मगुरुंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाकडून मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. धर्माविरोधात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य शासन कठोर कायदा करावा, अशी मागणी सपाचे नेते आणि आमदार अबू आझमी केली. शासन कायदा करणार नाही, तोपर्यंत राज्यभर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
याबाबत बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी कोणत्याही धर्मगुरुंविरोधात बोलण्याचा अधिकार नाही -
धर्म आणि धर्मगुरुंबाबत देशात वादग्रस्त विधाने सुरू आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून हिंदू आणि मुस्लिममध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जात आहेत. नुकत्याच एका प्रसार माध्यमांवरील चर्चेत मुस्लिम धर्मगुरुंविरोधात अपशब्द वापरण्यात आले. कोणीही त्याबाबत जाब विचारला नाही. समाजवादी पक्ष या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करतो. कोणत्याही धर्म गुरुबाबत बोलणे कायद्याने गुन्हा आहे. हा धार्मिक देश आहे. इथे कोणालाही कोणत्याही धर्माविरोधात बोलण्याचा अधिकार नाही. महापुरुषांच्या विरोधात अपशब्द बोलले जातात. ही बाब गंभीर आहे.
हेही वाचा -राज्यातील बार, मॉल सुरू मग मंदिरे का बंद ? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
धर्माविरोधी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करायला हवेत. राज्य शासनाला तसे अधिकार आहेत. असे कायदे झाल्यास वादग्रस्त विधाने करुन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना चांगलाच चाप लागेल, असे अबू आझमी म्हणाले. तसेच नुकतेच घडलेल्या मॉब लिंचिंगचा प्रकार धक्कादायक असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.