मुंबई : मुंबईत आज २४ जानेवारीला २७७२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात शून्य रुग्णांची नोंद झाली. सध्या २ रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून, एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार २४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ४७० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या २३ सक्रिय रुग्ण :सध्या २३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी २,०२,१८३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०००३ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४४३८ बेड्स आहेत. त्यापैकी २ बेडवर म्हणजे ०.०५ टक्के इतक्या बेडवर रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत उतार सुरू :मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. यादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली.
मार्च-एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली : मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन गेले काही दिवस १० हून कमी रुग्णांची नोंद होत आहे.
मुंबई मॉडेलची दखल : मुंबईमध्ये कोरोनाच्या सुरुवातीला इमारतीमधून प्रसार सुरू झाला. त्यानंतर झोपडपट्टी व दाटीवाटीच्या विभागात कोरोना रुग्ण आढळू लागले. मुंबईत धारावी येथे सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. त्याचप्रमाणे इतर विभागातही मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना पसरल्यास मुंबईत हाहाकार झाला असता. याला रोखण्यासाठी पालिकेने धारावी मॉडेल तसेच मुंबई मॉडेल राबवले. यामुळे कोरोना आटोक्यात राहिला. तसेच शून्य मृत्यूची नोंद होऊ लागली होती. पालिका आणि आरोग्य विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे आज तब्बल ३४ महिन्यांनी मुंबईत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.