महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई पिछाडीवर, १८ वरून ४९ व्या क्रमांकावर घसरण

मुंबईकरांकडून महापालिका कचरा उचलण्याचे शुल्क आकारात नसल्याने महापालिकेला 'थ्री स्टार रेटिंग' नाकारण्यात आले. यामुळे या सर्वेक्षणातून बाहेर पडण्याचा विचार महापालिकेकडून सुरु होता. महापालिकेने केंद्राला पत्र देऊन सर्वेक्षणातून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.

स्वच्छता सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक घसरला

By

Published : Mar 7, 2019, 10:11 AM IST

Updated : Mar 7, 2019, 10:36 AM IST

मुंबई- केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे स्थान घसरले आहे. मागील वर्षी १८ व्या क्रमांकावर असलेली मुंबई ४९ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मात्र, स्वच्छता सर्वेक्षणात 'सर्वोत्कृष्ट व नाविण्यपूर्ण उपक्रम' (बेस्ट कॅपिटल सिटी इन इनोव्हेशन ऍण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस) राबविणाऱया राजधान्यांच्या श्रेणीत मुंबई अव्वल ठरली आहे.


केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता सर्वेक्षण सुरु केले. या सर्वेक्षणात देशभरातील शहरे भाग घेत असतात. देशाची आर्थिक राजधानी व सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महापालिकाही या सर्वेक्षणात भाग घेत आली आहे. मुंबई स्वच्छ ठेवावी म्हणून २०१७ पासून महापालिकेकडून विविध प्रयोग केले जात आहेत. मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा पालिकेने केल्याने २०१८ मध्ये पालिकेला १८ वा क्रमांक देण्यात आला होता.

देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या मुंबई शहराला 'थ्री स्टार रेटिंग' मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी महापालिकेने केंद्राकडे अर्ज केला होता. मात्र, मुंबईकरांकडून महापालिका कचरा उचलण्याचे शुल्क आकारात नसल्याने महापालिकेला 'थ्री स्टार रेटिंग' नाकारण्यात आले. यामुळे या सर्वेक्षणातून बाहेर पडण्याचा विचार महापालिकेकडून सुरू होता. महापालिकेने केंद्राला पत्र देऊन सर्वेक्षणातून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.
महापालिकेने एकीकडे सर्वेक्षणातून बाहेर पडण्याचा इशारा दिला असताना केंद्राचे स्वच्छता निरीक्षक पूर्व कल्पना न देताच मुंबईत हजर झाले होते. त्यांनी अचानक केलेल्या सर्वेक्षणामुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या पार्श्र्वभूमीवर आज केंद्र सरकारने नवी दिल्लीत जाहीर केलेल्या 'स्वच्छता सर्वेक्षण २०१९' च्या निकालात मुंबई शहराचा क्रमांक १८ वरून ४९ व्या क्रमांकावर घसरल्याचे उघड झाले.

नाविण्यपूर्ण उपक्रमात मुंबईत अव्वल -
महापालिकेच्या 'एच पश्चिम' विभागात स्थानिक नागरिकांच्या मदतीने एक मेट्रीक टन कचऱयापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प, मरिन ड्राईव्ह येथील अद्ययावत शौचालय व इतर नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे. याबाबत बुधवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे संपन्न झालेल्या एका विशेष समारंभात केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल व उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Last Updated : Mar 7, 2019, 10:36 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details