महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई #Powercut : वीजसेवा पूर्वपदावर; मुख्यमंत्री ठाकरेंचे संबंधितांना 'हे' आदेश - मुंबई वीज पुरवठा न्यूज

mumbai powercut
मुंबई वीज पुरवठा

By

Published : Oct 12, 2020, 11:44 AM IST

Updated : Oct 12, 2020, 10:49 PM IST

18:40 October 12

वीज पुरवठा खंडित प्रकरणी टेक्निकल ॲाडिट करण्याचे आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बत्तीगुल संदर्भात मुख्यमंत्र्यानी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

16:42 October 12

  • मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर बोलावली महत्वाची बैठक
  • या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी...
  • नितीन राऊत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठकीला हजर
  • बैठकीला वीज कंपन्यांचे प्रतिनिधीही हजर

15:52 October 12

या घटनेला कोण जबाबदार; मुंबईत खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल.

15:52 October 12

आज (सोमवारी) सकाळपासून ठाण्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर दुपारपर्यंत काही भागात हा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे काम वीजपुरवठा खंडित झाल्याने पूर्णतः ठप्प झाले होते. मात्र, दुपारी महावितरणकडून सेवा पूर्ववत केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा सुरुळीत झाला. 

15:03 October 12

अखेर तीन तासांनंतर मुंबईतील वीजपुरवठा सुरू. 

15:00 October 12

ठाकरे सरकारच्या राज्यात अंधरे - मुबईतील वीजपुरवठा बंद झाल्यामुळे भाजपा नेते किरीट सौमेय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका.

13:00 October 12

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

वीज पुरवठा खंडित प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. सकाळी दहापासून खंडित असलेला मुंबईतील वीजपुरवठा आता हळूहळू पूर्वपदावर येतो आहे. 

12:34 October 12

वरळी नाना चौक गिरगाव येथे वीज पुरवठा सुरळीत

12:32 October 12

तीनही मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर

मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावरील लोकल सेवा तब्बल अडीच तासांनंतर पूर्वपदावर आणण्यात यश मिळाले आहे. 

12:32 October 12

लवकरच वीजपुरवठा सुरळीत करु - नितीन राऊत

लवकरच वीजपुरवठा सुरळीत करु - नितीन राऊत

वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. सर्व वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

12:27 October 12

अंधेरीमधील वीजपुरवठा सुरळीत

पश्चिम उपनगरानंतर आता अंधेरीमधील वीजपुरवठाही सुरळीत झाला आहे. 

12:18 October 12

काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरू

दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. मुलूंड, भांडूप, घाटकोपर, खारघर आणि पनवेलमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. यासोबतच वाशीमध्येही वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

12:14 October 12

रुग्णालयात वीज पुरवठा खंडित होऊ देऊ नका - पालिका आयुक्त

मुंबई -टाटा वीज कंपनीची कळवा येथील ग्रीड बंद पडल्याने आज मुंबईसह अनेक विभागातील वीज पुरवठा बंद झाला. या दरम्यान मुंबईमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून वीज पुरवठा खंडित होऊ देऊ नका असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईत वीज पुरवठा बंद असताना रुग्णालयांमधील वीज बंद होऊ नये, म्हणून डिझेलचा पुरवठा करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. वीज बंद राहू नये म्हणून पुरेसे डिझेल रुग्णालयांना पुरवण्याचे आदेशही आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. रुग्णालयातील आयसीयू आणि इतर महत्वाच्या विभागातील वीज बंद होऊन रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. 

12:10 October 12

कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा सुरळीत

मुंबई : आज सकाळी 10 च्या सुमारास संपूर्ण मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही तांत्रिक कारणांनी वीज पुरवठा खंडित झाला असताना आणि वीज येण्यास बराच काळ लागणार असताना कोविड सेंटरमधील रुग्णसेवेचे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण कोविड प्रशासनाने मात्र कोविड सेंटरमध्ये सर्व रुग्णसेवा सुरळीत असल्याची माहिती दिली आहे. वीज गेल्याबरोबर जनरेटरची सुविधा सुरू करण्यात आली असून 8 ते 12 तास पुरेल इतका वीजपुरवठा असल्याचे सेंटर कडून सांगण्यात आले आहे.

12:09 October 12

शेअर मार्केटच्या कामकाजावर परिणाम नाही

मुंबईतील वीजसेवा ठप्प झाल्यामुळे जवळपास सर्व व्यवहार थांबले आहेत. मात्र, असे असतानाही शेअर बाजारातील व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे समजत आहे.

12:01 October 12

आपातकालीन परिस्थितीसाठी हेल्पलाईन नंबर..

मुंबई महानगरपालिकने आपातकालीन परिस्थिसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहे. 022-22694727, 022-226947725 and 022-22704403 या तीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन बीएमसीने केले आहे.

12:00 October 12

कळव्यात अर्ध्या तासात सुरू होणार वीजपुरवठा..

पडघा-कळवा इथली ट्रिप झालेली लाईन सुरळीत झाली आहे. अंदाजे 30 मिनीटात बिघाडात दुरुस्ती होऊन, वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

11:59 October 12

विद्यापीठाच्या परीक्षांना फटका..

मुंबईतील वीज गायब झाल्याने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना फटका बसला आहे. केसी कॉलेजसोबत अनेक मोठ्या महाविद्यालयांनी आपल्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठ लवकरच सविस्तर घोषणा करणार आहे.

11:55 October 12

ठाण्यातील वीजपुरवठाही खंडित..

ठाणे : ग्रिड फेल्युअरमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बहुतांशी शहरात अचानक बत्ती गुल झाली आहे. तर दुसरीकडे कल्याण शीळ रोडवर असलेल्या नेतेवली नजीकच्या टाटा पावर कंपनीकडून वीज पुरवठा होणारे केबी 1 व केबी-2 हे दोन फिडर बंद पडले आहेत. केबी-२ फीडवरून कल्याण पश्चिमेला वीज पुरवठा होतो मात्र या भागातील 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर केबी-२ वरुन कल्याण पूर्व परिसर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा करण्यात येतो मात्र या विभागातील दहा हजार वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे.  

या दोन्ही फिटर वरील वीज ग्राहकांना पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत 16 हजार घरांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला आहे वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत असल्याचे टाटा पॉवर कंपनीकडून सांगण्यात आले.

11:50 October 12

मध्य मार्गाच्या हार्बर लाईनवर काही प्रमाणात लोकल सुरू

मध्य मार्गाच्या हार्बर लाईनवर काही प्रमाणात लोकल सुरू

पावर ग्रिड फेल झाल्यामुळे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल रेल्वे ही बंद पडलेली असताना यामध्ये हळूहळू आम्ही रेल्वे पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. सध्या हार्बर मार्गावर पनवेल ते सी एस एम टी या स्थानकादरम्यान टप्प्याटप्प्याने लोकल सेवा ही पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात असून मध्य मार्गावर सीएसएमटी ते कसारा बस सीएसएमटी ते कर्जत मार्गावर लोकलसेवा लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं शिवाजी सुतार यांनी म्हटलं आहे.

11:37 October 12

लोकल-रस्ते वाहतूक सेवेवर परिणाम..

मुंबई आणि उपनगरातील लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. सकाळी दहा वाजेपासून मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाली आहे. लोकल अचानक मधेच थांबल्यामुळे रुळांवरुन चालत जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

मुंबईतील रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम दिसून येत आहे. रस्त्यांवरील सिग्नल सेवा बंद झाल्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे.

11:36 October 12

मुंबईतील वीज पुरवठा विस्कळीत

मुंबई - शहरातील लाखो ग्राहकांना मुंबईबाहेरून वीज तयार करून विविध वीज कंपन्याद्वारे वीज पुरवठा केला जातो. मात्र आज ग्रीड फेलीयरमुळे मुंबईसह बाजूच्या जिल्हयातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मुंबईत शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी तर भांडुप व मुलुंड येथे एमएसईबी या वीज कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. ही वीज मुंबईबाहेर बनवून या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना पुरवली जाते. आज मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या ग्रिडमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रिड फेल्युअर झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Oct 12, 2020, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details