मुंबई -सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे दोघेजण क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या बुकीकडून खंडणी वसूल करत होते, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली. पैसे न दिल्यास अटक करू, अशी धमकी या दोघांकडून बुकीना दिली जात असल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. आता या क्रिकेट बुकींची मुंबई पोलीस चौकशी करणार असून त्यांना लवकरच समन्स पाठवून चौकशीला बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेतली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात सचिन वाझेचा तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतला. आता मुंबई गुन्हे शाखा कक्ष 11 ने अटक केलेल्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यात सचिन वाझेकडून उघड करण्यात आलेल्याक्रिकेट बुकी आणि हॉटेल व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे.
एनआयएने चौकशी केल्यानंतर वाझेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. यानंतर सचिन वाझेला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका खंडणी वसुली प्रकरणात ताबा मागितल्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेला तळोजा जेलमधून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. गुन्हे शाखेने खंडणी वसुली प्रकरणात वाझेला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने वाझेला पोलीस कोठडी दिली.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून केवळ हॉटेल व्यावसायिकच नाही तर क्रिकेट बुकीकडूनही वसुली केली जात होती, असा खुलासा वाझेने गुन्हे शाखेच्या चौकशीत केला होता. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली होती. हॉटेल व्यावसायिकांसह मुंबईतील बडे बुकीही वसुलीच्या टार्गेटवर होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता क्रिकेट बुकी आणि हॉटेल व्यावसायिकांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.