मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. मुंबईतही या हल्ल्याच्या निषेधार्थ 'गेटवे ऑफ इंडिया' येथे रविवारी रात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. यात सामान्य नागरिक आणि पर्यटकांना होणाऱ्या त्रासाचे कारण देत आंदोलकांना 'गेटवे ऑफ इंडिया'वरून आझाद मैदानात हलविण्यात आले आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीत जेएनयू (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर रविवारी भ्याड हल्ला झाला. अभाविप या उजव्या विद्यार्थी संघटनेच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला. या हल्ल्याचे पडसाद मुंबईसह देशभरात उमटले. या विरोधात मुंबईत 'गेटवे ऑफ इंडिया' येथे विद्यार्थ्यांचे रविवारी रात्री 12 वाजल्यापासून शांततेत आंदोलन सुरू होते. अनेक विद्यार्थी, नागरिक या ठिकाणी येऊन निषेध नोंदवत होते. या आंदोलनकर्त्यांना आता गेटवे ऑफ इंडियावरून आझाद मैदानात हलवण्यात आले आहे.