मुंबई -स्वतःच्या बेधडक वक्तव्यांनी विवादात सापडलेल्या अभिनेत्री कंगना रणौतच्या एका व्हायरल व्हिडिओ संदर्भात मुंबई पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून अद्याप या गोष्टीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
कंगनाच्या 'त्या' व्हिडिओबाबत मुंबई पोलीस करणार चौकशी?
पावसाळी अधिवेशनात प्रताप सरनाईक यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी कंगना रणौतचीही चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. एकेकाळी कंगना अमली पदार्थ घेत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याबाबत ही चौकशी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात कंगना काही वर्षांपूर्वी पार्ट्यांमध्ये ड्रग्स घेत होती. तिला तिच्या पेयात नकळत ड्रग्स दिले जात होते. त्यामुळे तिच्या आयुष्यात तिला बरेच चढ-उतार पहावे लागले असल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याच्या सोबत कंगणाचे प्रेम संबंध होते. स्वतः अध्ययन सुमन यानेही एका मुलाखतीत कंगना ही अमली पदार्थ घेत असल्याचे म्हटले होते.
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते की, कंगना व अध्ययन सुमन यांच्या असलेले संबंध व अमली पदार्थांचे कनेक्शन याबद्दल चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले होते. आता कंगना रणौत हिच्या संदर्भात मुंबई पोलीस कसा तपास करणार आहे व त्याचे स्वरूप कसे असणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.