मुंबई - आझाद मैदान येथे शरजील इमाम याच्या समर्थानात घोषणाबाजी करण्याचा आरोप असणाऱ्या 22 वर्षीय उर्वशी चुडावाला हिचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे. बुधवारी सत्र न्यायालयात उर्वशी चुडावाला हिच्या वकिलांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला.
उर्वशी चुडावालाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला, पोलिसांकडून शोध सुरू - उर्वशी चुडावाला घोषणाबाजी
आझाद मैदान येथे शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्याचा आरोप असणाऱ्या उर्वशी चुडावाला हिचा मुंबई पोलिसांकडून घेतला जात आहे. ती केवळ २२ वर्षांची असून एम.ए. शेवटच्या वर्षाला आहे. तिचे नुकसान होईल. त्यामुळे तिला अटकपूर्व जामीन देण्यात यावा, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.
आझाद मैदानावर देण्यात आलेल्या घोषणांमध्ये देशद्रोह संबंधित कुठलाही गुन्हा घडलेला नाही. उर्वशी चुडावाला हिचे वय केवळ 22 वर्ष असून ती एम. ए. च्या शेवटच्या वर्षाला आहे. येत्या मार्चमध्ये तिची परीक्षा असून अटकपूर्व जामीन न मिळाल्यास तिचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, असे उर्वशीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र, यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेत म्हटले की, आरोपी उर्वशी चुडावाला हिने तिच्या सहकाऱ्यांसोबत जाणीवपूर्वक देशविरोधी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर ती फरार असल्याने अटकपूर्व जामीन दिल्यास याचा परिणाम तपासावर होऊ शकतो. उर्वशी चुडावाला हिने केवळ घोषणाबाजी केली नाही, तर आझाद मैदानावरील व्हिडिओ सोशल माध्यमांवर पोस्ट करून शरजिल इमाम याची विनाअट सुटका करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात न्यायालयात सरकारी वकिलांनी पुरावे सुद्धा सादर केले.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात निर्णय देताना म्हटले की, हे प्रकरण बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर असले तरी उर्वशी चुडावाला हिने ज्याच्या समर्थानार्थ घोषणा दिल्या आहेत तो शरजील इमाम हा देशद्रोहाचा आरोपी आहे. तसेच तो पोलिसांच्या अटकेत आहेत. शरजील इमाम याने आसाम भारतापासून तोडण्याची भाषा केली होती. उर्वशी हिने त्याचे समर्थन केले असल्याचा आरोप असल्याने तिला अटकपूर्व जामीन देता येणे शक्य नाही, असा निर्णय न्यायालयाने दिले. त्यामुळे तिची अटकपूर्व जामीन देण्याची याचिका फेटाळून लावली.