मुंबई -'पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँके'च्या (पीएमसी) कथित गैरव्यवहार प्रकरणी आज आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे. बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रणजित सिंग यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला हा नववा व्यक्ती आहे.
हेही वाचा -आत्ताच्या आणि पुर्वीच्या एनडीएमध्ये मोठा फरक - संजय राऊत
पीएमसी बँकेच्या कर्ज कमिटीवर नियुक्त असताना रणजीत सिंग यांना पीएमसी बँकेने कर्ज वाटप केलेल्या कंपन्यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती होती. मात्र, 'एचडीआयल'च्या बुडीत कर्जासंदर्भात त्यांनी काय कारवाई केली? याचे समाधानकारक उत्तर ते मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला देऊ न शकल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. याबाबतची आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
काय आहे घोटाळा
पीएमसी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत भांडूपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची मोठ्या कर्जांची परतफेड होत नसताना ती खाती आरबीआयपासून लपवली होती. कमी कर्ज रकमेचा बनावट कर्ज खात्यांचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या पैशातूनच हा सर्व गैरव्यवहार करण्यात आला. हा सर्व गैरव्यवहार करण्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीचा पुढकार होता. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून गुन्हेगारीचा कट रचला आहे. कर्जाची परतफेड न करता कर्ज रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत बँकेची फसवणूक करण्यात आली.
हेही वाचा - सरकार पाच वर्ष टिकावं म्हणूनच बैठका सुरू - बाळासाहेब थोरात