मुंबई : संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात काल मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर चार हल्लेखोरांनी स्टंप आणि क्रिकेट बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात मनसे नेते संदीप देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. आता पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या दोन इसमांबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी दुजोरा दिलेला नाही.
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई :संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी हे भाडुंप पश्चिम येथील राहणारे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हा हल्ला राजकीय वादातून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव अशोक खरात तर दुसऱ्याचे नाव सोलंकी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींची पोलीस हे कसून चौकशी करत आहेत.
संधी साधून मागून हल्ला केला :मनसे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. नेहमी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच होते. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडेंना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला एक आरोपी हा माथाडी सेना उपाध्यक्ष असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली होती.
क्रिकेटच्या बॅट, स्टंपने हल्ला :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप देशपांडे हे शुक्रवारी सकाळी शिवाजीपार्क मैदानाभोवती मॉर्निंग वॉक करत असताना 7.15 वाजताच्या सुमारास तीन ते चार अनोळखी तरुणांनी त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅट व स्टंपने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांचा उजवा हात फॅक्चर झाला असून डाव्या पायास दुखापत झाली आहे. या हल्ल्या संदर्भात संदीप देशपांडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीपार्क पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 307, 506(2), 504, 34 सह क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट 7 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा :Antony Blinken In Auto : अँटोनी ब्लिंकनने केली ऑटोची सवारी! म्हणाले, अजून काही दिवस भारतात राहायचे आहे