मुंबईThreatening Call : एकीकडे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना संपूर्ण देश श्रद्धांजली वाहत असतानाच, एका दारूड्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली होती. किशोर लक्ष्मण ननावरे असं मद्यपीचं नाव आहे. त्याच्या मोबाईलवरून रविवारी सकाळी 9.43 वाजता नियंत्रण कक्षाला कॉल करून सांगितलं की, मानखुर्द पोलिस चौकी (Mankhurd Police Station) एकता नगर येथे 2 ते 3 दहशतवादी आले आहेत. त्यांची भाषा समजत नाही पण ते काहीतरी प्लॅन करत आहेत, त्यांच्याकडे एक संशयास्पद बॅग आहे.
पोलिसांना कॉलर घरीच सापडला: मुंबई पोलिसांना माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी पूर्ण सतर्कतेने घटनास्थळाचा शोध घेतला. मात्र एकही संशयित व्यक्ती दिसला नाही. पोलिसांनी फोन करणार्याला व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद लागला. त्यानंतर पोलिसांनी त्या क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांना कॉलर घरीच सापडला. कॉलर हा एकता नगर, गल्ली क्रमांक 3, मानखुर्द-छेडानगर लिंक रोड येथील रहिवासी आहे. तर तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील आहे.
दारू पिऊन केला कॉल : फोन करणारा हा पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीदरम्यान त्यानी सांगितलं की, तो दारू पिऊन विजय बारमधून घरी जात असताना, अज्ञात व्यक्तीने त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल करण्यास सांगितलं. त्या व्यक्तीने कोणाला कॉल केला होता हे माहीत नव्हतं. फोनवर बोलत असताना कॉलरने, त्याला त्याच्या घराजवळ सोडलं. मात्र, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना दारुड्याची कहाणी खोटी असल्याचं समजलय.
धमक्यांचे कॉल येण्याचे सत्र सुरूच : मानखुर्द पोलिसांनी आरोपी किशोर ननावरे याला भारतीय दंड संविधान कलम 182 आणि 505 (2) अन्वये अटक केल्याची माहिती, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सावंत यांनी दिली. गेल्यावर्षभरापासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अथवा वाहतूक विभागाला अशाप्रकारे धमक्यांचे कॉल येण्याचे सत्र सुरूच आहे. मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ला म्हणजे 26/ 11 होय. या हल्ल्यात अनेक पोलीसांना आपलं बलिदान द्यावं लागलं. मुंबईत 26 /11 निमित्त हुतात्मा यांना आदरांजली वाहत असताना अशाप्रकारे धमकीचा कॉल अल्याने, मुंबई पोलिसांचे धाबे दणाणले होते. मात्र हा कॉल एका दारुड्याने केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
हेही वाचा -
- 26/11 नंतर मुंबईत कशी आहे सुरक्षाव्यवस्था? जानेवारीपर्यंत बसविण्यात येणार साडेपाच हजार सीसीटीव्ही
- 26/11 दहशतवादी हल्ला : कसाबला कसं जिवंत पकडलं ? निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
- 26/11 दहशतवादी हल्ला : मुंबई पोलीस आयुक्तालयात हुतात्म्यांना मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह राज्यपालांची मानवंदना, पहा व्हिडिओ