मुंबई :एच पूर्वकडील मुंबई मनपा कार्यालयातील सहाय्य अभियंता पाटील यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. मनपातील भ्रष्टाचार विरोधात मनपा कार्यालयावर काढलेल्या मोर्चा दरम्यान हा प्रकार घडला होता. अभियंता पाटील यांनी वाकोला पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल आल्या नंतर पोलिसांनी कार्यवाहिला सुरुवात केली आहे. शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अॅड. अनिल परब यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर कलम 353, 332, 506 आणि 34 भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करून दोन माजी नगरसेवक आणि दोन शाखा प्रमुखांना अटक केली आहे.
13 जणांची चौकशी, चार अटक, उर्वरित फरार :माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम, शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. अभियंत्याला मारहाण प्रकरणी 13 जणांना वाकोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सीसीटिव्ही कॅमेरे तपासून यातील काही जणांना सोडून देण्यात आले. तर चार जणांना अटक केली असून उर्वरित फरार आहेत. वेगवेगळ्या टीम बनवून वाकोला पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.