मुंबई- परदेशातील शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या 2 आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
माहिती देताना पोलीस उपायुक्त अशाच एका प्रकरणात तामिळनाडूतील तीन तरुणांना लंडनमधील शिपिंग कंपनीत नोकरी मिळाली असून त्या ठिकाणी जाण्यासाठी पासपोर्ट व विसा घेण्यासाठी या तरुणांना बोलविण्यात आले होते. मात्र, या तिन्ही बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आली होती. या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.
पोलिसांनी या संदर्भात कार्तिकेयन रामास्वामी व कालिदास नटराजन या दोन आरोपींना अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून हे दोन्ही आरोपी लुटत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना परदेशात शिपिंग कंपनीत नोकरी मिळेल म्हणून हे दोन्ही आरोपी बनावट मुलाखत घेऊन, बनावट कंपन्यांच्या लेटरहेडवर नियुक्ती पत्र देऊन लाखो रुपये घेत होते. या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत मुंबईसह इतर राज्यातील शेकडो तरुणांना फसविले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - आता संजय राऊतांची तोफ भाजपविरोधात धडाडणार; राज्यसभेत शिवसेनेच्या आसन व्यवस्थेत बदल