मुंबई -राजस्थानात खून करून मुंबईला पळून आलेल्या आरोपीला युनीट - १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा कॅन्टीन चालक असून त्याने तेथेच काम करणाऱ्या एका कामगाराचा खून केला होता. चित्तौडग पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चित्तौडगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावलियाजी राजकीय सामान्य चिकित्सालय येथे कॅन्टीन चालवणाऱ्याने त्याच्याच कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा खून केला होता. यानंतर याप्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र व्यास (40) हा फरार झाला होता. या आरोपीला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 12 ने अटक केली आहे.
सापळा रचून केली अटक
खुनाच्या घटनेनंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. हा आरोपी मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या आरोपीच्या शोधासाठी राजस्थान पोलिसांकडून दोन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 15 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 12 ला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दहिसर तपासणी नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. या ठिकाणी आरोपी आला असता पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आव्हान केले. मात्र, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.