मुंबई-मोटारसायकलवरुन येऊन मोबाईल फोन चोरणाऱ्या व त्यानंतर आयएमईआय क्रमांक बदलून फोनची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल फोनची 5 ते 10 हजारात विक्री करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने वेगवेगळ्या ठिकाणावरुन लुटलेले व आयएमईआय क्रमांक बदललेले 48 महागडे मोबाईल फोन व इतर साहित्य जफ्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-7चे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली. या टोळीने गत दिड वर्षामध्ये लुटलेल्या शेकडो मोबाईल फोनचे आयएमईआय क्रमांक बदलून त्यांची विक्री केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मोबाईल फोन चोरणाऱ्या टोळीला अटक युसुफ हैदरअली शेख (24),नावेद नदीम शेख (21),मोहमद अमीन शेख (46), इक्बाल नासीर खान (32),सलमान अदील अहमद सिध्दीकी (32) व साबीर सलीम खान (34) या सहा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे समावेश आहे. युसुफ आणि नावेद हे दोघेही मोटारसायकलवरुन जाऊन रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील महागडे मोबाईल फोन लुटून नेत होते. त्यांनतर ते मोहम्मद शेख व इक्बाल खान या दोघांना लुटलेले मोबाईल फोन देत होते. त्यानंतर ते दोघे सलमान सिद्धीकी व साबीर खान या दोघांकडून लुटलेल्या मोबाईल फोन मधील आयएमईआय क्रमांक बदलून घ्यायचे. हे मोबाईल फोन 5 ते 10 हजारात विकले जात असल्याचे तपासात आढळून आले आहे.
हेही वाचा-'केंद्रात सत्तेत आहात ना, मग माझ्यासारख्या फकिराला का मदत मागता?'
25 ऑगस्टला सकाळी युसुफ आणि नावेद या दोघांनी अशाच पद्धतीने घाटकोपर येथील नित्यानंद नगर मध्ये राहणाऱ्या मोहम्मद रिजवान युसुफ खान याचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन लुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मोहम्मद रिजवान याने आरडा-ओरड केल्यानंतर त्या भागात गस्तीवर असलेले पोलीस हवालदार कदम आणि पोलिस शिपाई रोकडे त्यांचा पाठलाग करुन प्रथम युसूफ शेख याला नंबर फ्लेट नसलेल्या मोटारसायकलसह पकडले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा पळून गेलेला साथीदार नावेद शेख याला मानखुर्द येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांची कसुन चौकशी केली असता, या दोघांनी गत दिड वर्षामध्ये चेंबूर,घाटकोपर,दादर,विक्रोळी,मुलुंड आदी भागातील अनेक नागरिकांचे मोबाईल फोन लुटल्याचे व त्यांचे आयईएमआय क्रमांक बदलून विकल्याची कबुली दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक शेळके व त्यांच्या पथकाने मोहमद शेख व इक्बाल खान या दोघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सलमान अदील अहमद सिध्दीकी व साबीर सलीम खान यांच्या मानखुर्द शिवाजीनगर येथील मोबाईलच्या दुकानावर छापे टाकले असता सदर दुकानामध्ये जबरी चोरी करुन आणलेले व आयएमइआय क्रंमांक बदलण्यात आलेले वेगवेगळया कंपन्यांचे 48 महागडे मोबाईल फोन आढळून आले. पोलिसांनी सर्व मोबाईल फोन, तसेच हार्डडिस्क, दोन लॅपटॉप, दोन मोटारसायकल जफ्त करुन सलमान सिद्धीकी व साबीर खान या दोघांना अटक केली. सलमान व साबीर हे दोघेही संगणकामधील एसपी टुल या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मोबाईल फोन मधील आयएमइआय कमांक बदलून देत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर विकोळी,चेंबूर,शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असून त्यांनी कोणकोणत्या ठिकाणाहून मोबाईल फोन लुटले आहेत. तसेच किती मोबाईल फोनचे आयएमइआय कमांक बदलून त्यांची विक्री केली आहे, याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली.