मुंबई :शिवडी परिसरात सुरू असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ने पर्दाफाश केला आहे. कक्ष नऊचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ने एका संशयितास अटक केली आहे. त्याच्याकडून अंदाजे दोन कोटी चार लाख किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे.
शिवडीत अमली पदार्थाचा व्यापार :शिवडी परिसरात काही लोक अमली पदार्थाचा व्यापार करत असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 9 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवडी जिजाजी चाळ येथे छापा टाकला. छाप्यादरम्यान सलीम हारून खान याला १ किलो २८ ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रगची किंमत 2 कोटी 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सलीम हारून रशीद खान, इम्रान शोएब खान या दोन व्यक्तींकडे मेफेड्रोनचा साठा असल्याची महिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या टीप नंतर कक्ष 9 चे पथकाने शिवडी येथील आदमजी जीवाजी चाळ ही कारवाई केली.
आरोपींवर गुन्हा दाखल :इम्रान शोएब खान पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला, तर सलीम हारून रशीद खान याला पकडण्यात आले. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन आढळून आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 2 कोटी 4 लाख इतकी आहे. त्यांच्यावर एनडीपी कायदा 1985 च्या कलम 8(सी), 22(सी) आणि 29 अन्वये रफिक किडवई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील म्हाळसंक यांनी अवैध्यरित्या बाळगलेले एमडी पदार्थ जप्त केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.