मुंबई :स्वत:चे घर खरेदी करणे, हे अनेकांचे स्वप्न असते. अनेकजण आपले संपूर्ण आयुष्याभर जमापुंजी त्यासाठी जमा करतात. परंतु बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीमुळे अनेकांचे ते स्वप्न धुळीस मिळते. मुंबई पोलिसांनी अशाच दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक धर्मेश आणि राजीव जैन यांनी मुलुंडमध्ये ऑलिम्पिया, ओमेगा, पॅनोरमा आणि निर्मल वन स्पिरिट अशा रहिवासी इमारत प्रकल्प राबवत असल्याचे सांगून 201 ते 2011 या काळात 34 ग्राहकांकडून 11 कोटींपेक्षा अधिक रक्कम घेतली.
३ मे पर्यंत पोलीस कोठडी :विकासकांनी २०१७ मध्ये खरेदीदारांना सदनिका देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. फसवणूक झालेल्या खरेदीदारांनी एकत्र येऊन निर्मल लाइफस्टाईल होम बायर्स रिड्रेसल असोसिएशनची स्थापना केली. असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कुमार अरोरा यांच्यासह अन्य 33 तक्रारदार खरेदीदारांनी पोलिसांत तक्रार दिली. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरुवातीला मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर ते तपासासाठी ईओडब्ल्यूकडे हस्तांतरित करण्यात आले, असे अधिकारी म्हणाले.