मुंबई :मुंबई परिसरात लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली. या आरोपींकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी 19 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नंदकुमार कांबळी (३०), सनी शशिकांत सुर्वे (२८) आणि अभिषेक जयस्वाल (३० वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
61 वर्षीय वृद्धाला लुटले :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील मोगरा मेट्रो स्थानकाजवळ 61 वर्षीय एक वृद्ध आपल्या कार्यालयातून घराकडे रिक्षाने जात होता. वाहतूक कोंडीचा फायदा घेत आरोपींनी त्या वृद्ध व्यक्तीकडील बावीस लाख 19 हजार 600 इतकी रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. आणि पळ काढला. वृद्ध व्यक्ती आणि रिक्षा चालकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शस्त्र काढल्यामुळे दोघेही घाबरले. त्यामुळे आरोपी रोख रक्कम असलेली बॅग घेऊन फरार झाला. याविषयीची तक्रार फिर्यादीने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दिली या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कलम ३९२ भादवि अन्वये नोंद करून तपासात सुरुवात केली.