मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांच्या लाचेसह बुकींची माहिती देण्याची ऑफर दिली होती. व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स आणि अन्य मेसेज पाठवून 10 कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक केल्यानंतर वाॅन्टेड बुकी अनिल जयसिंघानीचे नाव चर्चेत आहे.
अनिल जयसिंघानीला अटक : सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बालसिंग रजपूत यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले होते. अनिल जयसिंघानीला अटक करण्यासाठी एजे हे विशेष ऑपरेशन करण्यात आले होते. आरोपी अनिल जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता. आरोपीवर विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता.
रात्री 11:45 वाजता आरोपीला ताब्यात घेतले : पुढे रजपूत यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांची 5 पथके अनिल जयसिंघानिला शोधण्यासाठी काम करत होती. त्यानुसार तीन पथके गुजरात येथे पाठवण्यात आली. आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली इथे गेल्याचे कळले होते. त्यानुसार या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. आरोपीने 72 तास गुजरातमध्ये पोलिसांना चकवा दिला होता. काल रात्री 11:45 वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त :गुजरात पोलिसांच्या मदतीने ऑपरेशन मुंबई पोलिसांनी यशस्वी राबवले. 13 मार्चला अनिल जयसिंघानी हा शिर्डी येथे होता. नंतर 14 तारीख पासून तो गुजरात येथे फरार झाला. गुजरातमध्ये 72 तास पोलिसांना गुंगारा देत होता. वडोदारा, भरुच नंतर गोध्रा येथे जात असताना 72 तासांच्या चकव्यानंतर गोध्रा येथील कलोल येथून बुकी अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेली गाडी ही महाराष्ट्र पासिंगची असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा एक नातेवाईक यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली असल्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बालसिंग रजपूत यांनी सांगितले.