मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासह रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या पाणी बिलाची रक्कम थकवल्याने बीएमसीने त्यांना डिफॉल्टर घोषित केले होते. त्यात आता मुंबई पोलिसांचीही भर पडली आहे. मुंबई पोलिसांनीही पालिकेच्या पाणी बिलाची तब्बल ९४ कोटी रुपयांची रक्कम थकवल्याचे समोर आले आहे.
मुंबई पोलिसांनीही थकवले पालिकेचे पाणी बिल, रक्कम ऐकून व्हाल थक्क! - मुंबई
जल विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस विभागाकडे तब्बल ९३ कोटी ८५ लाख ७९ हजार १५१ रुपयांची थकबाकी आहे. यामुळे पोलीस विभागाच्या एकूण ४६६ जलजोडण्या पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकल्या आहेत. ही रक्कम पोलीस विभागाने त्वरित पालिकेकडे जमा करावी अन्यथा पालिकेने सामान्य नागरिकांवर केल्या जाणाऱ्या कारवाई प्रमाणे पोलीस विभागाचे पाणी कापावे अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून, जल विभागाकडून पाणी बिलाच्या थकबाकीदारांची माहिती मागवली होती. जल विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस विभागाकडे तब्बल ९३ कोटी ८५ लाख ७९ हजार १५१ रुपयांची थकबाकी आहे. पोलीस विभागाच्या एकूण ४६६ जलजोडण्या पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकल्या आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त मुख्यालय, पोलीस निदेशक कार्यालय, अनेक पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त, पोलीस ठाणे, जीआरपी, वाहतूक पोलीस कार्यालय पोलीस वसाहतींचा समावेश आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची पाणी बिलाची ८ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने मुख्यमंत्र्यांचा बंगला व इतर शासकीय बंगले डिफॉल्टर यादीत असल्याचे शकील शेख यांनी माहिती अधिकारातून उघड केले होते. तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानेही २३४ कोटी रुपयांची पाणी बिलाची रक्कम थकवल्याचे उघड केले होते. आता पोलीस विभागाकडे ९४ कोटींची पाणी बिलाची थकबाकी शकील शेख यांनी उजेडात आणली आहे. ही रक्कम पोलीस विभागाने त्वरित पालिकेकडे जमा करावी अन्यथा पालिकेने सामान्य नागरिकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईप्रमाणे पोलीस विभागाचे पाणी कापावे, अशी मागणी शकील शेख यांनी केली आहे.