मुंबई Uorfi Javed viral video :आपल्या अतरंगी फॅशनमुळं आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळं अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. मात्र या वेळेस उर्फीचा एक व्हिडिओ तिच्या अंगलट आलाय. अतरंगी ड्रेस घातलेल्या उर्फीला दोन महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण झालं होतं. आता या व्हिडिओमागचं सत्य पोलिसांनी सांगितलं असून पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
व्हिडिओतील तोतया निरीक्षक अटकेत :पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अभिनेत्री उर्फी जावेद, दोन महिला आणि अन्य संबंधित व्यक्तींनी फसवणुकीच्या उद्देशानं पोलिसांचा गणवेश आणि ओळखीचा वापर करून रील्स बनवल्या आहेत. उर्फी जावेदनं प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवला आणि तो फेसबुकवर, इन्स्टाग्रावर व्हायरल झाला. त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली. त्यानंतर सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाणे गु.र.क्र. १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसंच या व्हिडीओतील तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि त्यातील वाहनही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.