मुंबई: मुंबई विमानतळावर खासगी विमान धावपट्टीवर घसरल्यानं प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. खराब हवामानामुळं हे विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर येत आहे. विमानतळावर टेक ऑफ आणि लँडिंग थांबविण्यात आलयं. खासगी विमानात ८ प्रवासी होते. VSR Ventures Learjet 45 या विमानाचा अपघात झालाय. हे विमान विशाखापट्टणम येथून मुंबई विमानतळावर पोहोचले होते.
विशाखापट्टणमहून मुंबईला जाणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्स लिअरजेट 45 विमान हे रनवे 27 वर लँडिंग करताना घसरले. ही माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली. डीजीसीएच्या माहितीनुसार विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. विमानतळावरील ड्युटीवरील अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आहे.
तिघे जण जखमी-अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे उड्डाणे वळवावी लागली आहेत. त्यामुळे धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली. हा अपघात सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटाला झालाय. विमानात ६ प्रवाशांसह २ क्रू मेंबर प्रवास करत होते. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुर्घटना घडताच विमानानं पेट घेतला. काही वेळातच अग्नीशमनकडून विमानाला लागलेली आग विझविण्यात आली.