मुंबई - भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एक ट्विट करत राजकीय क्षेत्रात उत्सुकता वाढवली आहे. '१२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना 'गोपीनाथ गड' येथे आमंत्रण, तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्ही ही या.. वाट पहाते', असे ट्विट पंकजा यांनी केले आहे. यानंतर टि्वटनंतर पंकजा यांनी पुन्हा त्या येत्या १२ डिसेंबरला काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढवली आहे.
गेल्या काही दिवसांआधी पंकजा यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्या आगामी काळात राजकीय भूकंप करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, विधानसभा निवडणूकीत झालेला माझा पराभव मी स्वीकारत आहे. मी अशी विनंती करते की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जबाबदारी माझी आहे. आता आगामी काळात काय निर्णय घ्यायचा, कोणत्या मार्गाने जायचे यासंदर्भात तुमच्याशी १२ डिसेंबरला आपली भूमिका स्पष्ट करेन. अशा प्रकारची भावनिक पोस्ट केल्यानंतर पंकजा भाजपला रामराम ठोकणार अशा वावड्या उठल्या. त्या पक्षावर नाराज असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, यानंतर काही दिवसांनी मी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या निव्वळ अफवा आहेत. तसेच माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा -'विरोधी पक्षाची भूमिका नागपूर अधिवेशनापासून बजावू'