मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या नियमांची नाईट क्लब, पबकडून पायमल्ली करण्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर मुंबईतील नाईट क्लब, पब, हॉटेल्स, रेस्टॉरंटकरिता कठोर मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना देखील गस्त घालण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी प्रत्येक विभागात दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांवर बंदी येऊव शकते, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका पब, नाईट क्लब'मध्ये नियम धाब्यावर -
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. तरीही अनेकजण विनामास्क मुंबईत फिरताना आढळून येतात. संबंधितांवर पालिकेकडून कठोर कारवाई केली जाते. तसेच मास्क वापरणे, गर्दी टाळणे, हात धुणे या त्रिसुत्री धोरण अवलंब केला जात आहे. असे असताना नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट, पबमध्ये मास्क न लावता हजारो जण धिंगाणा घालत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच लोअर परळ येथील एपिटोम नाईट क्लब आणि वांद्रे येथील एका नाईट क्लबमध्ये दोन हजारांच्या आसपास ग्राहक विनामास्क एकत्र जमल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. पालिकेने या क्लब विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर मुंबईतल्या सर्व नाईट क्लब, हॉटेल, पब्सना सुधारणा करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यासाठी कडक मार्गदर्शक तत्वे ( एसओपी) तयार केली जाणार आहे.
प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंटसाठी कडक मार्गदर्शक तत्वे-
प्रत्येक वॉर्डात पथके तयार केली आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर धाड टाकली जाईल. २४ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या विभागातील नाईट क्लबवर केव्हाही धाड टाकण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच जे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणार नाहीत आणि एसओपी धुडकावल्याचे आढळून येतील. त्यांच्यावर त्वरित कारवाईचे अधिकारही सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. प्रत्येक हॉटेल रेस्टॉरंटसाठी ही कडक मार्गदर्शक तत्वे असणार आहेत. त्यांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी प्रत्येक विभागात २ पथके तयार केली आहेत. यामध्ये १ आरोग्य अधिकारी, १ अग्निशमन दलाचा अधिकारी आणि एक सुरक्षा दलाचा अधिकारी असणार आहेत. तसेच आवश्यतेनुसार पोलीसांची मदत घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. या कारवाईचा २० डिसेंबरपर्यंत आढावा घेऊन पुढील कारवाईबाबत नियोजन आखले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली.
नववर्षाच्या स्वागत फटाक्यांवर बंदी! -
कोरोना संक्रमणाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी गर्दी टाळण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येवर पालिका लक्ष ठेवणार आहे. मात्र, रुग्णसंख्या पूर्ण नियंत्रणात न आल्यास दिवाळीप्रमाणेच आगामी नववर्ष स्वागतासाठी फटाके वाजवण्यावर बंदी येऊ शकते, असे संकेत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावीच लागेल. नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे रुग्णवाढ होत असल्याचे समोर आल्यास पुन्हा कठोर नियमावली घालावी लागेल, असा इशाराही काकाणी यांनी दिला आहे.
हेही वाचा-शाळांमधील शिपाई आणि इतर चतुर्थश्रेणींची पदे रद्द, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांकडून तीव्र संताप
हेही वाचा-लालबाग गॅस दुर्घटना: मृतांचा आकडा ५ वर, ८ जणांची प्रकृती चिंताजनक