मुंबई- मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांना ऑक्सिजनही मोठ्या प्रमाणात लागत आहे. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याने मुंबईला सध्या 235 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पुरवठा योग्य प्रमाणात असल्याने सध्या तरी ऑक्सिजनची कमतरता भासत नसल्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या आठवड्यात 2 दिवसांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या 6 रुग्णालयातील 168 रुग्णांना इतर रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात सुसूत्रतता व समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेने सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला 235 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा कमी करण्यात येऊ नये. प्राणवायू उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये देखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेची पथके नेमण्यात येत आहेत. ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला प्राणवायू साठा किती त्याची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये अद्ययावत करतील. त्यामुळे दररोज किती प्राणवायू मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येईल, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. दिवसाला 235 मॅट्रिक टन ऑक्सिजनची मुंबईला आवश्यकता आहे. यापैकी 20 टक्के ऑक्सिजनचा साठा असतानाच ऑक्सिजन टाक्यांमध्ये भरले जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
500 टन अधिक ऑक्सिजनची मागणी
मुंबईतील सर्व रुग्णालयांना विशेषतः खासगी रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठ्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे 500 टन अधिकचा ऑक्सिजनचा साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळेल. तथापि, तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेसह प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील ‘मिशन मोड’वर काम करावे, महानगरपालिकेने नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांसमवेत मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर प्राणवायू साठा पुरवावा. प्राणवायुच्या कमतरतेमुळे कोणताही अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे निर्देशही आयुक्तांनी दिल्याचे काकाणी यांनी सांगितले.
12 ठिकाणी नवे ऑक्सिजन प्लांट
ऑक्सिजनची निर्माण झालेली त्रुटी भरून काढण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी मुंबईतील 12 ठिकाणांची निवड झाली असून त्यात प्रामुख्याने करोना जंबो सेंटरसह रुग्णालयांचाही समावेश आहे. पुढील एका महिन्यात सर्वच्या सर्व 12 केंद्रात ऑक्सिजन प्रकल्प तयार होऊन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. एका जंबो सेंटर वा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प तयार झाल्यावर तिथे एका तासात 2 ते 5 हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन उपलब्ध होईल. त्यातून एकाचवेळी 25 ते 30 रुग्णांना त्याचा पुरवठा करता होणार आहे. इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने प्रकल्प तयार झाले की तिथल्या रुग्णालयांना ऑक्सिजन सुरळीत मिळण्यात अडचणी येणार नाहीत. सध्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पसाठी सुमारे अडीच कोटी रुपये इतका खर्च आला होता. पालिकेने सध्या 12 जंबो कोरोना केंद्र, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात हे प्रकल्प पूर्ण होतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
हेही वाचा -सपाचे आमदार अबू आझमींची भडकाऊ भाषण प्रकरणी 13 वर्षानंतर निर्दोष मुक्तता