मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेमका अवतार कोणता आहे, हेच अजून निश्चित झालेले नाही. यामुळे वेळोवेळी झेंडा, त्याचे रंग बदलून फार फरक पडणार नाही त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांची मने वळवावी, मते, विचार रुजवावे लागतात आणि ते मनसेला आता शक्य होणार नाही, अशी टीका जलसंपदामंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
मनसेने आता आपला झेंडा आणि त्याचा रंग बदलला आहे. त्यामुळे मनसे भाजपला जवळ वाटते आहे. यावेळी मनसे आणि भाजपचे हिंदुत्व यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केली. भाजप हिंदूंची मते वापरण्याची वोटबॅंक होती. याचप्रमाणे आता मनसेने भगवा झेंडा वापरला असल्याने भाजपच्या पोटात धस्स व्हायला लागले असल्याचेही पाटील म्हणाले. भाजप शरद पवारसाहेबांना घाबरतो, याचे एक उत्तम उदाहरण आहे.